Headlines

बॉक्स ऑफिस क्लॅश टाळण्यासाठी यशचा मोठा निर्णय; ‘टॉक्सिक’च्या रिलीजमध्ये बदल?

‘टॉक्सिक’ या बिग बजेट चित्रपटाबाबत ‘केजीएफ’ स्टार यशने मोठा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याने याबद्दलची माहिती दिली आहे. येत्या 19 मार्च रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता.

मार्च महिन्यात दोन मोठ्या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस टक्करची जोरदार चर्चा होती. एकीकडे रणवीर सिंहचा ‘धुरंधर 2’ आहे तर दुसरीकडे साऊथ सुपरस्टार यशचा ‘टॉक्सिक’. हे दोन्ही बिग बजेट चित्रपट येत्या 19 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होते. परंतु एकाच दिवशी प्रदर्शित होणार असतील तर कोणाला तरी त्याचा फटका निश्चितच बसेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यातच मध्य पूर्वेतील युद्धाची परिस्थिती उद्भवली आणि सगळंच गणित फिस्कटलं. या सर्व गोष्टींचा विचार करून यशने एक पाऊल मागे घेतलं आहे. सोशल मीडियावर त्याच्या टीमने चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेविषयी मोठी अपडेट जाहीर केली आहे.

‘टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन अप्स’ हा चित्रपट आम्ही जगभरातील प्रेक्षकांसाठी बनवला आहे. कन्नड आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये या चित्रपटाचं शूटिंग केलं असून भारतातील आणि जगभरातील प्रेक्षकांना जोडण्याच्या हेतूने त्याची निर्मिती केली आहे. अनेक वर्षांच्या कठोर मेहनतीनंतर आम्ही हा चित्रपट 19 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासाठी उत्सुक होतो. परंतु आताची परिस्थिती पाहता, खासकरून मध्य पूर्वेतील युद्धामुळे जगभरातील अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याच्या आमच्या हेतूमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. यामुळे आम्ही कठीण पण अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेऊन या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. आता हा चित्रपट जगभरात 4 जून 2026 रोजी इंग्रजी आणि भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *