Headlines

शेअर बाजारात येणार सरकारी ‘पॉवर’! महावितरणच्या IPO ची तारीख ठरली; कृषी विभाग वेगळा करणार, ग्राहकांवर काय परिणाम होणार?

Mahavitaran IPO: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (MSEDCL) शेअर बाजारात पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून, कंपनी आपला कृषी व्यवसाय स्वतंत्र करणार आहे. कृषी क्षेत्रातील 76000 कोटी रुपयांच्या थकबाकीचा बोजा कमी करून कंपनीची आर्थिक स्थिती सुधारणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

Mahavitaran MSEDCL IPO Launch Date: महाराष्ट्रातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी असलेली महावितरण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (MSEDCL) आता शेअर बाजारात उतरण्याच्या तयारीत आहे. शेअर बाजारात लिस्टिंग होण्यापूर्वी म्हणजेच येत्या एप्रिल महिन्यापर्यंत आपला कृषी विभाग स्वतंत्र करण्याचा निर्णय घेतला आहे. या धोरणात्मक निर्णयामुळे कंपनीवरील कर्जाचा बोजा कमी होऊन आयपीओ (IPO) चा मार्ग मोकळा होणार आहे.

महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले की, “डिसेंबर 2026 पर्यंत महावितरणचा आयपीओ आणण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. त्यापूर्वी एप्रिलपर्यंत कृषी व्यवसायाचे डिमर्जर (विलीनीकरण प्रक्रिया) पूर्ण केले जाईल.” विशेष म्हणजे, कृषी विभाग ही उपकंपनी (Subsidiary) न राहता एक स्वतंत्र संस्था म्हणून काम करेल, जेणेकरून कृषी क्षेत्रातील थकबाकीचा परिणाम मुख्य कंपनीच्या ताळेबंदावर होणार नाही.

कर्जाचे ओझे होणार कमी

सध्या महावितरणवर एकूण 96,000 कोटी रुपयांची थकबाकी आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यातील तब्बल 76,000 कोटी रुपये केवळ कृषी क्षेत्रातील वीज वापराशी संबंधित आहेत. या प्रचंड थकबाकीमुळे कंपनीला खेळत्या भांडवलासाठी (Working Capital) मोठ्या प्रमाणावर कर्ज घ्यावे लागते, ज्यामुळे आर्थिक ताण वाढतो.

एप्रिलमधील प्रक्रियेनंतर, मुख्य महावितरण कंपनीकडे केवळ 20,000 कोटी रुपयांचे कर्ज शिल्लक राहील. हे कर्ज व्यवस्थापन करण्यायोग्य असल्याचे कंपनीचे मत आहे. या ‘बॅलन्स शीट क्लीन-अप’ नंतर कंपनीची आर्थिक स्थिती सुधारेल आणि गुंतवणुकदारांसाठी ती अधिक आकर्षक ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *