Whatsapp new features 2026 : जगातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप ‘व्हॉट्सॲप’ (WhatsApp) आपल्या युजर्ससाठी लवकरच काही जबरदस्त फीचर्स घेऊन येत आहे. यामध्ये ऑटो-शेड्यूल मेसेज, स्पॉयलर टेक्स्ट आणि ग्रुप चॅट हिस्ट्री यांसारख्या क्रांतिकारी बदलांचा समावेश आहे. या अपडेट्समुळे केवळ सोयच वाढणार नाही, तर चॅटिंगवर युजर्सचे नियंत्रण अधिक मजबूत होणार आहे.
नेमके काय आहेत हे नवीन बदल?
अनेकदा आपल्याला एखाद्याला मध्यरात्री वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतात किंवा कामाचा महत्त्वाचा रिमाइंडर पाठवायचा असतो, पण वेळेवर ऑनलाईन राहणे शक्य नसते. हीच अडचण ओळखून व्हॉट्सॲप आता ‘मेसेज शेड्यूलिंग’ची सुविधा देणार आहे. यासोबतच सिनेमाचे गुपित किंवा सरप्राईज लपवण्यासाठी ‘स्पॉयलर’ फीचर आणि ग्रुपमध्ये नवीन येणाऱ्या सदस्यांसाठी ‘हिस्ट्री’ पाहण्याची सोय, असे एकापेक्षा एक फीचर्स येत्या काळात पाहायला मिळणार आहेत.
१. ऑटो-शेड्यूल मेसेज: वेळेचे टेन्शन मिटणार!
आता तुम्हाला मेसेज पाठवण्यासाठी रात्री उशिरापर्यंत जागण्याची किंवा अलार्म लावण्याची गरज नाही. तुम्ही मेसेज आधीच लिहून त्याची तारीख आणि वेळ ठरवू शकता. ठरवलेल्या वेळी व्हॉट्सॲप स्वतःहून तो मेसेज समोरच्या व्यक्तीला पाठवेल. हे मेसेज एका वेगळ्या विभागात दिसतील, जिथून तुम्ही ते बदलू किंवा डिलीटही करू शकाल.
२. स्पॉयलर (Spoiler) फीचर: सरप्राईज राहील कायम!
एखाद्या चित्रपटाचा क्लायमॅक्स सांगायचा असेल किंवा कोणतीही महत्त्वाची ओळ लपवायची असेल, तर हे फीचर कामाला येईल. स्पॉयलर फीचरमुळे तुमच्या मेसेजचा काही भाग एका धूसर थराने झाकला जाईल. समोरच्या व्यक्तीने त्यावर टॅप केल्याशिवाय तो वाचता येणार नाही. यामुळे सस्पेन्स आणि चॅटिंगची मजा अधिक वाढेल.
३. ग्रुप चॅट हिस्ट्री: नवीन सदस्यांना मिळेल ‘झलक’
ग्रुपमध्ये नवीन सदस्य जोडला गेला की त्याला आधी काय चर्चा झाली हे कळत नाही. आता नवीन अपडेटनुसार, नवीन सदस्याला मागील २५ ते १०० मेसेज पाहण्याची परवानगी मिळू शकते. यामुळे चर्चा समजणे सोपे होईल आणि जुन्या चॅट्स स्क्रोल कराव्या लागणार नाहीत.
