Ranji Trophy Final 2026 : पहिल्यांदाच रणजी फायनलमध्ये गेलेल्या जम्मू काश्मीर संघाचा कर्नाटकसोबत सामना सुरू आहे. या सामन्यामध्ये मोठा वाद पाहायला मिळाला. कॅप्टन आणि कर्नाटकचा बदली खेळाडू अनीशसोबत वाद घातला.

मुंबई : कर्णधार पारस डोगरा (७० धावा) याने बुधवारी अर्धशतकी खेळी केली खरी; पण कर्नाटकचा बदली खेळाडू के. व्ही अनीश याला जाणूनबुजून दुशी दिल्यामुळे (हेड-बट) दमदार जम्मू-काश्मीरच्या फलंदाजीला गालबोट लागले. जम्मू-काश्मीरने कर्नाटकविरुद्धच्या रणजी करंडक अंतिम सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेरीस सहा बाद ५२७ धावा केल्या आहेत.
डोगरासह यष्टीरक्षक-फलंदाज कन्हैया वाधवान (७०), साहिल लोत्रा (नाबाद ५७ धावा) यांनीही भरीव योगदान दिल्याने कर्नाटकच्या गोलंदाजांचा घाम निघाला होता. फक्त प्रसिध कृष्णा (२९ षटकांत ९० धावांत तीन विकेट) हाच प्रभावी ठरला. मात्र, २१ रणजी मोसमांचा दांडगा अनुभव असणाऱ्या पारस डोगरा याच्या वर्तनाने साऱ्यांनाच चकित केले. प्रसिधच्या चेंडूवर एक चौकार लगावल्यानंतर त्याने ‘सिली पॉइंट’ वरील क्षेत्ररक्षक अनीशला ढुशी मारली.
नेमके काय झाले ?
अनीशच्या कोणत्या टोमण्यामुळे डोगरा संतापला हे स्पष्ट झाले नाही. – डोगराने आधी अनीशशी वाद घातला आणि नंतर त्याच्या हेल्मेटला डोक्याने टक्कर दिला. यानंतर कर्नाटकचा वरिष्ठ खेळाडू मयंक अगरवाल याने मध्यस्थी करत डोगराला थांबवले. अगरवाल-डोगरा यांच्यातील संवादानंतर मैदानातील पंच रोहन पंडित आणि उल्हास गंधे यांनीही मध्यस्थी केली. काही वेळानंतर कर्नाटकचा कर्णधार देवदत्त पडिक्कल यानेही पंचांकडे दाद मागत डोगराची तक्रार केली.
