Headlines

PF Refund New Rule: PF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी! विसरलेल्या पैशांसाठी आता क्लेमची गरज नाही; थेट बँक खात्यात येणार पैसे

EPFO Rule Change: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) निष्क्रिय पडलेल्या पीएफ खात्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पीएफ कार्यालयाकडे पडून असलेले हजारो कोटी रुपये खऱ्या वारसांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. यासाठी कोणत्याही क्लेम फॉर्मची गरज नसून, आधार लिंक असलेल्या खात्यात हे पैसे आपोआप येतील.

EPFO clearing dues automatically: ईपीएफओने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या नातेवाईकाने काही दिवस नोकरी करून सोडली असेल आणि पीएफच्या पैशांवर दावा किंवा क्लेम केला नसेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या नियमांत अचानक मोठा बदल केला असून, आता निष्क्रिय खात्यांमधील पडून असलेले पैसे थेट बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या खात्यांमध्ये 1000 रुपयांपेक्षा कमी रक्कम आहे आणि जी 3 वर्षांपासून बंद आहेत, अशा 7 लाख खातेधारकांच्या बँकेत 30.52 कोटी रुपये थेट जमा केले जाणार आहेत.

काय आहे नवा नियम?

EPFO ने दिलेल्या माहितीनुसार, ज्या पीएफ खात्यांमध्ये गेल्या 3 वर्षांपासून (36 महिने) कोणताही व्यवहार झालेला नाही आणि ज्यामध्ये 1000 रुपयांपेक्षा कमी रक्कम शिल्लक आहे, अशी खाती ‘निष्क्रिय’ मानली गेली आहेत. अशा सुमारे 7 लाख खात्यांमध्ये एकूण 30.52 कोटी रुपये अडकलेले आहेत. आता ही रक्कम कोणत्याही कागदपत्रांशिवाय किंवा क्लेम फॉर्मशिवाय थेट संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यात पाठवली जाणार आहे. एपीएफओच्या या निर्णयामुळे 7 लाखांहून अधिक ईपीएफओ खातेदारांच्या थेट खात्यात पैसे जमा होणार आहेत.’पैसे मिळवण्यासाठी काय करावे लागेल?

या प्रक्रियेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी खातेधारकाला कोणताही अर्ज करण्याची गरज नाही. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑटोमॅटिक असेल.

ज्यांचे पीएफ खाते बँक खाते आणि आधारशी लिंक आहे, त्यांच्या खात्यात हे पैसे थेट जमा होणार आहेत.

जर मूळ खातेधारकाचा मृत्यू झाला असेल, तर ही रक्कम त्यांच्या नॉमिनीला म्हणजेच वारसाला दिली जाणार आहे.

11 हजार कोटी रुपये पडून

सध्या EPFO कडे एकूण 31.86 लाख निष्क्रिय खाती आहेत, ज्यामध्ये तब्बल 10903 कोटी रुपये जमा आहेत. पहिल्या टप्प्यात 1000 रुपयांपेक्षा कमी रक्कम असलेल्या 7 लाख खातेधारकांना पैसे परत केले जात आहेत. ही प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर, ज्या खात्यांमध्ये मोठी रक्कम शिल्लक आहे, अशा खातेधारकांशी संपर्क साधून त्यांचे पैसे परत करण्याची मोहीम राबवली जाणार आहे.

त्यामुळे, जर तुमच्या बँक खात्यात अचानक EPFO कडून 1000 रुपयांपर्यंतची रक्कम जमा झाली, तर समजा की हे तुमच्या जुन्या विसरलेल्या पीएफ खात्याचे पैसे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *