
इंडिया AI इम्पॅक्ट समिटने खरंच काय मिळवलं, याचं उत्तर तुम्ही ज्याला विचाराल, त्याच्याकडून वेगवेगळं मिळू शकतं.
- सरकारला विचाराल तर ते सांगतील की भारताचं AI विश्वात नाव झालं, भारताचा दबदबा निर्माण झाला. देशाची शक्ती सिद्ध झाली.
- विरोधकांना विचाराल तर हा AI समिट म्हणजे PR इव्हेंट असं उत्तर आल्याचं आपण पाहिलं.
- टेक विश्वातल्या बॉस मंडळींना विचाराल तर ते सांगतील की हा इव्हेंट भारतात होणं चांगली बाब आहे, पण यावर आणखी काम करण्याची गरज आहे.
- आणि नवीन लहान-लहान उद्योजकांना विचाराल तर त्यांच्यासाठी हे नवीन क्षितिजं खुली करणारं पर्व होतं.
दिल्लीच्या भारत मंडपममध्ये पार पडलेल्या या कृत्रिम बुद्धिमत्तेवर केंद्रित परिषदेत, मेळाव्यात काही विषय विशेष गाजले, ज्यांची चर्चा अधिक झाली.
पहिल्याच दिवशी पंतप्रधान, मंत्री आणि इतर VVIP मंडळींमुळे लोकांना सुरक्षा व्यवस्थेवर तणाव निर्माण झाला आणि आयोजकांची तारांबळ उडाली.
मग काही एक्झिबिटर्सनी म्हटलं की त्यांचं सामान चोरीला गेलं होतं, तर काहींना तर आवारातच प्रवेशच नाकारण्यात आल्यामुळे त्रास झाला. या कार्यक्रमाचे आयोजन केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्रालयाने केले होते. त्यांच्यावर गैरव्यवस्थापनाचे आरोपही झाले.
