अमेरिकेत १९७० चा बंगाली चित्रपट ‘अरण्येर दिन रात्रि’ डिजिटल अवतारात रि-लाँच करण्यात आला आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते सत्यजित रे यांच्या या चित्रपटाला नवीन ४के रूपात मॅनहॅटनमधील प्रसिद्ध आर्ट-हाऊस सिनेमागृह ‘फिल्म फोरम’मध्ये दोन आठवड्यांसाठी पुन्हा दाखवला जात आहे.
जुने चित्रपट जतन करणारी संस्था ‘द फिल्म फाऊंडेशन’, ‘फिल्म हेरिटेज फाऊंडेशन’ आणि ‘जानस फिल्म्स’ यांनी मिळून याचे नव्या रूपात जतन केले. गेल्या वर्षी न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा चित्रपट दाखवण्यात आला होता आणि आता तो सामान्य प्रेक्षकांसाठी खुला झाला आहे. कोलकात्याच्या शहरी वातावरणात राहणाऱ्या चार मित्रांच्या मस्तीमागे लपलेली पुरुषी सत्ता आणि जातीय अहंकाराच्या कथेवर आधारित ‘अरण्येर दिन रात्रि’ १९७० मध्ये जितका प्रासंगिक होता, तितकाच आजही अचूक आहे. चित्रपटामध्ये कोलकात्याच्या (तेव्हाचे कलकत्ता) उच्च जातीय, सुशिक्षित, इंग्रजी बोलणाऱ्या अशीम, संजय, हरी आणि शेखर या अविवाहित तरुणांची कथा आहे, जे शहराच्या गोंगाटापासून दूर झारखंडमधील पलामूच्या जंगलात सहलीला जातात. हॉलीवूड चित्रपट समीक्षक जे. होबरमन म्हणतात, ‘हा चित्रपट केवळ एका प्रवासाची कथा नाही, तर बंगालच्या मध्यमवर्गीयांचे असे चित्रण आहे, जे आपल्या सोयींच्या कोशात कैद आहे.
नव्या झळाळीत पडद्यावर, आजही जादू कायम
री-रिलीजसोबत एक प्रकारे प्रश्नही पुन्हा उभा राहिला आहे – भारतीय सिनेमाने आजवर रे यांच्या या चित्रपटाप्रमाणे प्रामाणिकपणे ‘कम्फर्टेबल’ मध्यमवर्गीयांना, पुरुषी हट्टीपणाला आणि आदिवासी समुदायांप्रति असलेल्या दृष्टिकोनाला पडद्यावर पूर्ण ताकदीने मांडले आहे का? न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस शहरात शोनंतर तरुण प्रेक्षक पॉलिटिक्स आणि जेंडरवर चर्चा करताना दिसत आहेत.
